एक सामान्य दिसणारी, साधारण किंवा घरातल्याच कपड्यांमधल्या एखाद्या बाईची इन्स्टाग्राम रील तुम्हाला हल्ली दिसत असेलच. ही बाई फक्त आपल्या दिवसाबद्दल त्या रीलमध्ये सांगत असते. आज मी केर काढला, बेडशीट बदललं, नवऱ्याला डब्यात भेंडीची भाजी दिली, आज मुलगा आजारी आहे म्हणून तो घरातच आहे वगैरे रोजच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल ती त्या व्हिडीओतून सांगत असते. आपण कधीकधी त्याकडे अगदी दुर्लक्ष करून अशा रील्स स्क्रोल करत असू. पण कधी याचा विचार केला आहे की, या अशा रील्समुळे त्या महिलेच्या आयुष्यात काय बदल झाला असेल?

“घरातच असणाऱ्या बायकांना असं घरात काय काम असतं?”, “माझी आई/बायको घरातच असते, काही नाही करत” वर्षानुवर्षे स्त्रिया या टिप्पण्या ऐकत आल्या आहेत. पण आता मी घरात काय करते हे या स्त्रिया मोठ्या अभिमानाने जगाला सांगत आहेत.

या डिजिटल क्रांतीमुळे स्त्रियांना यातून नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी काही मर्यादांमुळे स्त्रियांना शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असत, पण आज या डिजिटल साधनांनी अडथळ्यांवर मात करण्याचे सामर्थ्य दिले आहे.

गेल्या दशकभरात देशात इंटरनेटचा प्रसार मोठ्या वेगाने झाला. अगदी गावखेड्यातही मोबाईल आणि इंटरनेट पोहोचलं. गावाकडच्या स्त्रियांमध्येही इंटरनेटच्या वापराबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. याचा वापर फक्त रील्स बघण्यासाठी न करता आपले घरगुती व्यवसाय वाढवण्यासाठी, आपल्यातली कौशल्ये जगासमोर आणण्यासाठी याचा उपयोग करू लागल्या आहेत.  शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. घरबसल्या काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्रियांना आता कुटुंब व करिअर यांच्यात समतोल राखणं अधिक सुलभ झालं आहे. 

शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधी

डिजिटल शिक्षणामुळे महिलांना जगभरातलं ज्ञान अगदी एका क्लिकवर सहज मिळत आहे. कोर्सेरा, युडेमी सारखे प्लॅटफॉर्म असोत किंवा सरकारी ई-लर्निंग उपक्रम सर्वांचा लाभ घेऊन महिला आता आत्मनिर्भर बनू लागल्या आहेत, नवनवीन कौशल्ये आत्मसात करू लागल्या आहेत. परदेशातल्या एखाद्या प्राध्यापकाचं व्याख्यान भारतातल्या छोट्याश्या खेड्यात आपल्या घरात बसून ऐकता येऊ लागलं आहे.

स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी
डिजिटल युगाने महिलांना स्वतःचे उद्योग सुरू करणं सोपं झालं आहे. Instagram, Facebook, YouTube, Amazon यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. घरून व्यवसाय करणं आणि तो वाढवणं हे शक्य होण्यामध्ये डिजिटल माध्यमांचं मोलाचं योगदान आहे.

सामाजिक सक्षमीकरण
सोशल मीडिया हा महिलांसाठी सशक्त व्यासपीठ ठरला आहे. आपल्यावर होणारा अन्याय, आपल्याला आलेले वाईट अनुभव या सगळ्याबद्दल सोशल मीडियामुळे आता स्त्रियांना व्यक्त होता येत आहे. अनेक स्त्रिया आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडत आहेत आणि सामाजिक सुधारणेसाठीच्या चळवळींची सुरुवातही करत आहेत.

आरोग्य आणि डिजिटल साधनांचा वापर
स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास मदत व्हावी, अशी अनेक अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. अगदी विविध प्रकारचे व्यायाम करून घेण्यापासून ते पाळीची तारीख, दिवस, या काळात होणारे त्रास यांची माहिती ठेवणारे अ‍ॅप्स स्त्रिया वापरत आहेत. त्यामुळे त्या आपल्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग होताना दिसत आहेत.

आता ही झाली चांगली बाजू. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. त्याप्रमाणेच डिजिटल जगात काही धोकेही आहेत. ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, अपप्रचार, ट्रोलिंग यांचा सामना कसा करायचा, फसवणूक कशी टाळायची, त्याविरुद्ध कुठे तक्रार करायची, या सगळ्या बाबत अजूनही अधिक जागरुकता निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्याला आलेले अनुभव सांगून, त्यातून धडा घेऊन, आपल्याला आलेल्या अनुभवांविषयी व्यवस्थित माहिती घेऊन स्त्रियांनी स्वतः सावध व्हायला हवं आणि इतरांनाही माहिती देऊन सावध करायला हवं. भारतात अजूनही ग्रामीण तसंच काही प्रमाणात शहरी भागातही डिजिटल साक्षरतेचा अभाव आहे. म्हणूनच महिलांना तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था ते अगदी तंत्रज्ञानाशी परिचित असलेल्या तरुणांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल साधनांनी स्त्रियांना सशक्त केलं आहे. मात्र, या संधींचा योग्य वापर आणि आव्हानांवर मात करण्यासाठी सजगता निर्माण करणं  आवश्यक आहे. आधुनिक काळातलं हेच खरं स्त्री सक्षमीकरण!

1 comment on “डिजिटल युग आणि आधुनिक काळातलं स्त्री सक्षमीकरण