WHat is Media

“मीडिया विकला गेला आहे”, “एखाद्या पक्षाचा झाला आहे”, “हल्ली हे मीडियावाले काहीही दाखवतात, कशाचीही बातमी करतात”, हे संवाद आजकाल घराघरात, गल्लीबोळात, चौकात कुठेही ऐकायला मिळतात. पण मीडिया म्हणजे नक्की काय, त्याचा तुम्हाला आम्हाला काय फायदा?

तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक गर्दी दिसते. काय झालं आहे हे बघायचा तुम्ही प्रयत्न करता, शेजारच्या माणसांकडून तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळते. हा झाला संवाद. पण हीच माहिती जेव्हा तुम्हाला वर्तमानपत्रातून, टीव्ही, रेडियोतून मिळते किंवा साध्या व्हॉटसपवर येते, फेसबुकवर येते – तेव्हा या सगळ्यांना म्हणतात माध्यमे. म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर, जगात काय घडत आहे, याच्याशी तुम्हाला जोडून ठेवणारा एक पूल म्हणजे ही माध्यमे आहेत.

भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच कुठेतरी लांब, समजा दुबईला चालू आहे. तुम्ही दुबईला न जाताही ती घरबसल्या पाहू शकत आहात. दिल्लीमध्ये असलेल्या संसदेत देशाबद्दल घेतले जाणारे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला तुमच्या गावात बसून कळत आहेत. हे सगळं शक्य होतं या माध्यमांमुळे. काही गोष्टी तुम्ही डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकत नाही. त्या गोष्टी तुम्हाला या माध्यमांमुळे कळतात, पाहणं शक्य होतं. माध्यमे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात.

या माध्यमांचेही काही प्रकार आहेत. ते प्रकार आपण पाहूया.

छापील माध्यमे – यामध्ये वर्तमानपत्रे, मासिक, साप्ताहिक अशा छापून येणाऱ्या स्वरुपातल्या माध्यमांचा समावेश होतो. अगदी तुमच्या घरात वर्तमानपत्रामधून येणारं पॅम्प्लेटसुद्धा एक माध्यमच आहे.

प्रसार माध्यमे – रेडियो, टेलिव्हिजन यांचा यामध्ये समावेश होतो.

डिजिटल माध्यमे – ब्लॉग्ज, युट्यूब व्हिडीओज, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स यांचा डिजिटल माध्यमांमध्ये समावेश होतो.  

सोशल मीडिया – फेसबुक, ट्विटर, व्हॉटसप, इन्स्टाग्राम यांचा या प्रकारात समावेश होतो.

माध्यमे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याच्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही माध्यमे करत असतात. पण वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादाही आहेत. त्या मर्यादा ओळखून त्यांच्यापासून येणाऱ्या माहितीची आपल्या विवेकाच्या आधारे खातरजमा करून घेणं हेही सामान्य माणसाचं काम आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या बाबतीत ही खबरदारी घेणं फार आवश्यक आहे.

वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी ही अनेक गाळण्या लावून तयार केलेली असते. त्यातून वाचकांपर्यंत १०० टक्के सत्य पोहोचावं असा या गाळण्या लावण्यामागचा उद्देश असतो. प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन, घटनेशी संबंधित लोकांकडून माहिती घेऊन, त्या माहितीवर आवश्यक ती संपादकीय प्रक्रिया करून ही माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली जाते. तर टीव्ही माध्यमांमध्ये पत्रकार स्वतः घटनास्थळी जाऊन तिथली माहिती आपल्याला समोर दाखवत असतात. संबंधित लोकांशी होत असलेली चर्चा आपल्याला प्रत्यक्ष टीव्हीवर दाखवली जाते. पण सोशल मीडियाच्या बाबतीत या माहितीच्या सत्यासत्यतेबद्दल कोणीही पूर्ण खात्री देऊ शकत नाही. कोणीही आपल्या हाती लागलेली माहिती कसलीही खातरजमा न करता पुढे पाठवू शकतो. त्यामुळे विशेषतः सोशल मीडियावरून आलेल्या माहितीची खातरजमा करूनच त्यावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे.

माध्यमे ज्याप्रमाणे समाजाचा आरसा आहेत असं मानलं जातं. त्याप्रमाणे ती एक खिडकीही आहे. ज्याप्रमाणे खिडकी आपल्याला समोर जे काही चाललं आहे ते थेट दाखवते. पण काही वेळा ही खिडकी अर्धवट उघडी असते. त्यामुळे आपल्याला उघड्या खिडकीतून जेवढं दिसतं, त्यावरच आपण विश्वास ठेवतो. आरश्याचंही तसंच आहे. काही वेळा आरसा अगदी स्वच्छ असतो पण काही वेळा तो धूसरही झालेला असतो. त्यामुळे आपण कोणत्या माध्यमांकडून माहिती घेतो, त्याची खातरजमा कशी करतो, हेही महत्त्वाचे ठरते.