लेखिका – धनश्री भावसार – बगाडे

विजयादशमी या दिवशी रामाने रावणाला मारले तर नऊ दिवस नऊ रात्र युद्ध करून देवीने महिषासुराचा दशमीला वध केला. धर्माने अधर्मावर विजय मिळवला अशी धार्मिक मान्यता असणारा हा दिवस. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो. पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमांचा शुभारंभ दसऱ्याला करत होते. याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

याचेच प्रतीक म्हणून गावाच्या वेशीबाहेर रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गावाची वेस ओलांडून म्हणजे गावाबाहेर रावणाचा पुतळा जाळायचा आणि वेशीवरील आपट्याची पाने आणून त्याची घरी पूजा करायची. ही झाली प्रथा. पण या मागचा अर्थ कधी जाणून घेतला आहे का? या दहनामागे समाजातील आणि आपल्या सर्वांच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते. नकारात्मकता, दुर्गुण संपवून आपली वेस (कक्षा) रुंदावायची. परिघाबाहेर पडून कमतरतेवर मात करत विजय प्राप्त करायचा. मग हा विजय किंवा हे सीमोल्लंघन फक्त फटाक्यांचा रावण जाळल्याने होते का हो?

आजच्या काळाचा विचार केला तर आपण कामानिमित्त रोजच लांब प्रवास करत असतो. कामानिमित्त किंवा अगदी फिरायलासुद्धा लोक देशाची वेस ओलांडून परदेशात जातात. मग एकाअर्थी आपण कायमच सीमोल्लंघन करतो असे म्हणता येईल का? मग दसऱ्याच्या या सीमोल्लंघनाचे हल्लीच्या काळात महत्त्व ते काय?

सीमोल्लंघन म्हणजे केवळ गावाची, देशाची वेस ओलांडणे एवढाच सीमित अर्थ या प्रथेमागे नक्कीच नाही. मग काय आहे हे सीमोल्लंघन? मुळात काळ कितीही बदलला तरी प्रत्येक काळात सीमोल्लंघनाची आवश्यकता असतेच आणि असणार. कारण बदल आणि प्रगती ही कधीही थांबत नाही. खरे सीमोल्लंघन म्हणजे तुम्हीच स्वतः भोवती घातलेल्या कुंपणाला, सीमेला ओलांडून स्वतःच्या कक्षा रुंदावत जाणे म्हणजे सीमोल्लंघन.

आता इथे काहींची गल्लत होऊच शकते की सीमा ओलांडायची म्हणजे बेलगाम, बेछूट वागायचे का? तर अजिबात नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा कितीही पुसट असली तरी ती जपावीच लागते. पण त्याचा विस्तार कुठे आकुंचला आणि आणि कुठे विस्तारला आहे याची जाणीव आणि भान तर असायलाच हवे.

कम्फर्ट झोनचे सीमोल्लंघन
म्हणजे पाहा ना, एकाच जागी बसून किंवा पडून राहून कधी प्रगती होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडून कृती करणे आवश्यक असते. बऱ्याचदा आपल्या सवयीच्या गोष्टी या आपल्या कंफर्टझोन असतात. मग आपण बराच काळ तेच ते करत राहतो आणि कालांतराने आपल्याला वाटू लागते की मला या शिवाय दुसरे काही जमणारच नाही. बराच काळ एकाच क्षेत्रात काम केल्यावर काहींना हे जाणवू शकते. त्यामुळे त्यातून बाहेर पडून दुसरे काहीतरी ट्राय करण्याचा ते प्रयत्नही करत नाही. किंवा जर कधी तशी वेळ आलीच तर त्यांचा आत्मविश्वास पूर्ण खचलेला असतो. त्यामुळे आपल्या कंफर्टझोनच्या बाहेर पडून नवीन गोष्टी शिकण्याची, नवे काहीतरी ट्राय करण्याची ‘रिस्क’ घेणे म्हणजे देखील सीमोल्लंघनच आहे.
बऱ्याचदा आपण भीती, न्यूनगंड, आळस किंवा अगदी अहंकारामुळे देखील आपल्या कंफर्ट झोनला कवटाळून बसलेलो असतो. पण खरेतर आपण आपल्या प्रगतीला, आपल्यातील अनेक पैलूंना खुलण्यासाठी यामुळे मज्जाव घातलेला असतो. ही भीतीची, न्यूनगंडाची सीमारेषा ओलांडत आपण जेंव्हा नवे पाऊल उचलतो ते खरे सीमोल्लंघन आपण करत असतो.

सीमोल्लंघन हे शारीरिक कृतीद्वारे होण्याआधी मानसिकदृष्ट्या होणे फार गरजेचे असते. कारण आपण जसा विचार करतो तशीच कृती आपल्याकडून घडत असते. आपल्या मनातले समज, गैरसमज, भीती, न्यूनगंड, आळस, अहंकार अशा मनातील अनेक गोष्टींचा आपल्या विचारांवर आणि पर्यायाने आपल्या कृतीवर परिणाम होत असतो. ज्याची परिणती ही आपली प्रगती खुंटणे आणि डबक्यातील आयुष्य जगणे यात होत असते. जर डबक्याबाहेर पाऊल टाकण्याची रिस्क घेतली नाही तर पुढचा प्रवास सुरू होणार कसा? मला अशाच राहण्याची सवय झाली आहे, लोक काय म्हणतील, मागील अनुभव वाईट होता आता परत तेच घडले तर, हे माझे जग आहे हे सोडून मी का जाऊ? अशा एक ना अनेक सबबी सांगून आपण आपल्या कंफर्टझोनच्या बाहेर यायला नाकारत असतो. मनाच्या याच सीमारेषा ओलांडत आपल्याला हे मानसिक सीमोल्लंघन करायचे आहे.

स्वतःच स्वतःभोवती सीमारेषा आखा

आपण बऱ्याच चुकीच्या गोष्टींना कवटाळून बसलेलो असतो. काही वेळा हे चूक आहे हे माहीत असूनही आपण त्याबाहेर पडण्यास घाबरत असतो. त्यामुळे जसे आपल्याला आपल्या सीमारेषा ओळखून त्या ओलांडणे महत्वाचे असते, तसेच काही वेळा इतरांसाठी काही सीमारेषा आखत याचे उल्लंघन केलेले चालणार नाही हे ठणकावून सांगणे हेदेखील आवश्यक असते. पण बऱ्याचदा इतरांसाठी ही सीमारेषा आखताना आपल्याच मनात भीती, शंकांचे काहूर माजलेले असते. विवाहित महिलांच्या बाबतीत हे अधिक घडते. एखाद्या गोष्टीला नकार देणे हीच ती सीमारेषा असते. पण जर मी नाही म्हणाले तर घरच्यांना काय वाटेल? त्यांची अडचण होईल, मला नावे ठेवतील, त्यांना राग आला तर? लोक काय म्हणतील? अशा अनेक शंका, कुशंका, भीतीमुळे आपल्याला कितीही त्रास होत असला तरी ती स्त्री ते सर्व करत राहते. त्यागाचे महत्त्व कितीही असले तरी स्वतःचे मूल्य जाणणे ही देखील आजच्या काळाची गरज आहे. अशावेळी मनातल्या या भीतीवर, शंकांवर मात करत इतरांसाठी स्वतः भोवती एक सीमारेषा आखणे हे सुद्धा तिचे सीमोल्लंघनच म्हणता येईल.

अर्धवट ज्ञानाचे, अज्ञानाचे सीमोल्लंघन
कोणतीही नवी वस्तू घ्यायची असेल किंवा नवी सुरुवात करायची असेल तर दसरा हा सर्वोत्तम दिवस समजला जातो. अगदी शिक्षणाची सुरुवात म्हणजे लहान मुलांना केली जाणारी अक्षर ओळख देखील दसऱ्यापासून केली जाते. थोडक्यात अज्ञानातून ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारा हा दिवस आहे. आपल्या वैचारिक कक्षा रुंदावणारा हा दिवस आहे. आपल्याकडे साजरे होणारे सणवार, रूढी परंपरा हे अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेले असतात. मूळ ज्या उद्देशाने त्या सणाची किंवा रीतिभातींची सुरुवात झालेली असते त्याची माहिती बहुतांश लोकांना नसते. मग तो पाळीचा विटाळ मानणे असो किंवा कुठला कुळाचार असो. गोष्टींच्या मुळाशी आपण पोहचत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीने अर्थ काढत पुढे जात राहतो. यात मूळ उद्देश, शास्त्र यात एवढी भेसळ, अपभ्रंश झालेले असतात की मूळ कोणाला माहीतच नसते. मग या अशाच अर्धवट माहितीवर समाज सणवार, रूढी, प्रथा यावर वाट्टेल तशी टीका, निंदा नालस्ती करत त्याला चुकीची ठरवतो. या अर्धवट ज्ञानाचे नव्हे अज्ञानाचे सीमोल्लंघन करत मूळ शास्त्र नेमके काय सांगते हे जाणून घेणे ही देखील काळाची गरज आहे.

मानसिक सीमारेषा ओलांडून पलीकडे जाण्यासाठी आधी आपल्या अल्प ज्ञानाच्या पलीकडे अजून बरेच काही आहे हे स्वीकारण्याची तयारी प्रथम असणे आवश्यक असते. तरच आपली वैचारिक, मानसिक कक्षा रुंदवू शकतात. यासाठी भरपूर प्रवास करून नवनवीन लोक, संस्कृती, जीवनशैली समजून घेण्याचा अनुभव घेणे, भरपूर आणि विविध वाचन, श्रवण करणे हे नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

तर मग, या दसऱ्याला तुम्ही कोणते सीमोल्लंघन करणार? कमेंट करून नक्की सांगा.

Dhanshri Bhavsar

लेखिका – धनश्री भावसार-बगाडे

लेखिका मुक्त पत्रकार असून त्या सध्या मानसिक समुपदेशक म्हणूनही काम करत आहेत. 

6 comments on “नव्या काळातील असूर आणि मानसिक सीमोल्लंघन

  1. . “Looking forward to more articles from this author.”
    . “Keep sharing your knowledge!”
    “Inspiring read, thanks for sharing!”