Tigress in Tadoba National PArk

वैष्णवी संयोग

घरात बसून जंगल सफारीबद्दल लिहिणं हा खरं म्हणजे विनोदच म्हणायला हवा. अर्थात ही जंगल सफारी काही काल्पनिक नाही. मात्र ती घडून गेल्यानंतर ती आठवून आठवून लिहिणं म्हणजे महाप्रचंड अवघड काम. त्यावेळी आलेले अनुभव, अंगावर आलेले शहारे, कुठून कोणतं हिंस्र जनावर पुढे येईल याची सतत असलेली अनामिक भीती, उघड्या जीपमधून पडलो तर, कोणी जनावराने आपल्यावर उडी टाकली तर अशा एक ना अनेक शंका कुशंका या खरंतर त्या त्या वेळीच टिपण्याची काहीतरी सोय असायला हवी होती.

मी वर लिहिल्यावरून तुम्हाला हे कळलंच असेल की जंगल सफारीचा हा माझा पहिलाच अनुभव. आत्तापर्यंत म्हणजे केवळ आपल्या आवडीच्या माणसांसोबत फिरायला जाणं ही व्याख्या असलेली मी पहिल्यांदाच ताडोबाच्या त्या अवाढव्य जंगलातली दुनिया अनुभवत होते.

महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची संधी मला या वर्षीच्या एप्रिल महिन्यात मिळाली. कडक ऊन, जवळपास सुकलेलं जंगल अशा परिस्थितीत नक्की बघायला काय मिळणार आहे? अशा काहीशा नकारात्मक विचारानेच मी या सहलीला निघाले होते. नागपुरात मुक्काम होता. सकाळी सहा वाजताच्या सफारीचं तिकीट होतं. त्यामुळे अगदी मध्यरात्री म्हणजे एकच्या सुमारास आम्ही नागपुरातून ताडोबाकडे निघालो. अगदी म्हणजे अगदीच सुनसान रस्ता. अजिबात झोपायचं नाही, असा निर्धार करून निघालेली मी तो काळोख बघून पेंगुळले होते. प्रकल्पाच्या हद्दीत प्रवेश केला आणि अचानक एक छोटासा प्राणी आमच्या गाडीच्या प्रकाशात उड्या मारत चालला होता. वेळ होती मध्यरात्रीचे तीन साडेतीन. प्रचंड काळोख, फक्त आमची एकच गाडी आणि समोर हा प्राणी. थोडी भीती वाटत होती. गाडीचा ड्रायव्हर स्थानिक आणि तयारीचा असल्याने त्याने या प्राण्याविषयी सांगितलं. तो ससा होता. हे ससे अंधाराच्या वेळी हमखास गाडीसमोर येतात, चालकाची दिशाभूल आणि त्यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात, असंही चालकाने सांगितलं. त्यामुळे त्याच्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करण्याकडे चालकाचा कल होता. मी मात्र अधाशासारखी, जंगल सफारी आत्तापासूनच सुरू झाल्यासारखी त्या सशाकडे पाहात होते, त्याच्या हालचाली टिपत होते.

सफारी सुरू होण्याच्या अगदी दोन तास आधी पोहोचल्याने बराच वेळ हातात होता. त्याच सुनसान जंगलात, त्यातल्या त्यात सुरक्षित जागा पाहून आम्ही गाडी थांबवली आणि गाडीतच झोपून राहिलो. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन, ठरलेले सोपस्कार, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष सफारीला सुरुवात झाली. पहिलीच वेळ असल्याने मी गांगरून गेले होते. प्रवेशद्वारातून आमची जीप अगदी १०० मीटरच आत गेली असेल अन् तेवढ्यात माझ्या हातातलं महागडं घड्याळ गाडीतून खाली पडलं. सोबत असलेला गाईड शांतपणे खाली उतरला, त्याने घड्याळ उचललं आणि माझ्या हातात दिलं. “थोडं आत गेलो की हे असं करता येणार नाही बरं का”, असा एक छोटासा टोमणाही लगावला. त्याकडे काही फारसं लक्ष न देता मी आजूबाजूचं जंगल बघू लागले.

सर्वात आधी दर्शन दिलं सांबराच्या कळपाने. तीन चार सांबर रस्ता ओलांडत होते. यापूर्वी कात्रजच्या उद्यानात, राणीच्या बागेत पिंजऱ्यातली सांबर अनेकदा पाहिली होती, पण नैसर्गिक अधिवासातली, मोकळेपणाने फिरणारी सांबर पहिल्यांदाच पाहिली. खूश होऊन खरं तर मी त्यावरच समाधान मानलं होतं. तेवढ्यात त्या मातीच्या रस्त्यावर वाघाच्या पावलांचे ठसे दिसल्याचं आम्हाला गाईडने सांगितलं. कुतुहलाने मीही ते ठसे पाहू लागले. आता तर सोन्याहून पिवळं, चला इथेच तिकीट वसूल झालं, हेही मी उगाच ठरवून घेतलं होतं. या विचारातच पुढे जात असताना अचानक गाडी एका छोट्याश्या पाणवठ्याजवळ थांबली. गाईडने सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला आणि गवताच्या हालचालींकडे लक्ष देण्याची खूण केली. बारकाईने पाहिलं तर एक जबरी नजर जणू माझ्यावरच खिळली होती.

टवकारलेले कान, लांबलचक मिश्या, जहरी गोल डोळे….ती वाघीण होती. क्षणभर जणू माझ्या हृदयाची धडधडच थांबली. त्या गवतातून ती वाघीण डोकावत होती आणि माझ्याही नकळत मी त्या वाघिणीच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागले होते. अंगावर भीतीने अक्षरशः काटा उभा राहिला होता. काहीतरी गंभीर चूक केल्यानंतर आपण आईच्या नजरेतून कशी नजर चोरायचो लहानपणी त्याप्रमाणे मी उगाचच तिच्यापासून नजर चोरू लागले. अन् त्याच क्षणी माझ्याकडेच बघत ती उठली. तिचा तो अवाढव्य देह पाहून मात्र माझी चांगलीच गाळण उडाली. अंग थंडगार पडलं होतं. एक एक पाऊल अगदी संथ गतीने टाकत ती माझ्याच दिशेने येत होती. जीप उघडी होती आणि अवघ्या १०० एक मीटर अंतरावर ती वाघीण होती. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. शक्य तितकं अंग चोरून घेऊन, नजर चोरत मी तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होते. मला तिला बघायचंही होतं, तो अनुभव हातातून जाऊ द्यायचा नव्हता. पण तिच्याकडे बघून भीतीही वाटत होती. मोकळा वाघ पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होते. कदाचित तिला माणसं इतक्या जवळून पाहणं नवीन नसेल. त्यामुळे तिच्या नजरेत आत्मविश्वास होता आणि माझ्या नजरेत प्रचंड भेदरलेपण. ते तिने जाणलं असणार. तिने एक जांभई दिली आणि या भेदरलेल्या जीवाला तिच्या प्रचंड आणि जीवघेण्या सुळ्यांचं दर्शन घडवलं अन् मान थेट गवतात घातली. मी खाली बघितलं तर तिची दोन गोंडस बछडी तिला बिलगली होती. तिने माझ्याकडे पाहिलं, मग बछड्यांकडे पाहिलं आणि त्यांना मानेने थोडासा धक्का देत त्यांच्यासह दाट जंगलात निघून गेली.

मी इकडे सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण तिची नजर मला शांत बसूच देत नव्हती. एखाद्या नवजात बालकाला जसं आपल्या आजूबाजूचं जग बघताना कुतुहल वाटत असतं, त्याच कुतुहलाने मी आता ते जंगल पाहू लागले. विविध प्रकारची झाडं, पक्षी, वेली, छोटे मोठे प्राणी असं बरंच काही त्या वाटेवर पाहायला मिळालं. शिकार आणि शिकारी एकत्र एकाच छताखाली किती गुण्यागोविंदाने राहत होते, असा जरासा वेडसर विचार मी करत असतानाच आमची जीप एका जलाशयाजवळ येऊन पोहोचली. पहिल्या वाघिणीच्या भीतीतून मी सावरत असतानाच समोर दुसरी वाघीण उभी होती. चालक आणि गाईड दोघेही सरावलेले असल्यामुळे त्यांनी थेट त्या वाघिणीच्या जवळच गाडी उभी केली. मी ज्या बाजूला बसले होते, नेमकी त्याच बाजूला ती वाघीणही बसली होती. माझ्यापासून अक्षरशः दोन ते तीन हात अंतरावर. मी जीपमध्ये आणि ती खाली जीपच्या चाकाजवळ.

सकाळचे सात साडेसात वाजले होते. तिचं निम्मं शरीर पाण्यात होतं आणि चेहरा आणि पुढचे दोन पाय पाण्याबाहेर होते. तिचं आमच्या हालचालींकडे अजिबात लक्ष नव्हतं. चार माणसं आपल्या समोर उभी आहेत, याकडे तिने साफ दुर्लक्ष केलं होतं. पहिल्या वाघिणीच्या अनुभवानंतर मी थोडीशी धीट झाले होते. पण आता ही दुसरी वाघीण नुसती पाय उंचावून उभी जरी राहिली तर आपल्या अगदी जवळ पोहोचेल, हे साफ लक्षात आल्याने पुन्हा एकदा घाबरगुंडी उडाली होती. पण ही इतकी शांत कशी? ही माझ्याकडे बघत का नाही? मी भित्री आहे हे तिला कळलं आहे का, म्हणून ती मला भाव देत नाही का? अशा काहीतरी विचित्र विचारांमध्ये मी गढून गेले होते. तेवढ्यात ती पाण्यातून उठली आणि जीपच्या विरुद्ध दिशेने चालू लागली. माझं तिच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष होतं. तिने तिरप्या नजरेनेही आमच्याकडे पाहिलं नव्हतं. दहा पंधरा पावले पुढे जाताच तिने मागे वळून एक जहरी कटाक्ष टाकला. काही वेळ तिची नजर माझ्यावरच खिळली होती. माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याही ते लक्षात आलं असावं. तेही मला सांगत होते की ती तुझ्याकडेच पाहते आहे. आता मात्र मी धीट झाले होते. मीही तिच्या नजरेला नजर दिली आणि तिच्याकडे रोखून पाहू लागले. क्षणभर मला वाटलं की ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती आणि ते मला कळलं याची तिला खात्री पटली. तिने पुढे पाहिलं आणि आपल्या वाटेने निघून गेली. तिची जाडजूड पावलं धूळ उडवत चालली होती.

माझ्या गाडीसह आता आणखी तीन ते चार गाड्या तिथे दाखल झाल्या होत्या. प्रत्येक गाडीत चार अशी साधारण १५ ते २० माणसं तिच्याकडे पाहत होती. त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती आपल्याच रुबाबात चालली होती. गाईडने काही अंतरावर दुर्बिणीने पाहिलं. त्या छोट्याशा तळ्याच्या दुसऱ्या काठावर एक गवा पडला होता. त्या वाघिणीने अवघ्या काही तासांपूर्वीच त्याची शिकार केली असणार, असा अंदाज त्याने बांधला. त्या शिकारीनंतर ती निवांत बसली होती.

पण ती मला काय सांगत होती? कदाचित पहिली वाघीणही मला तेच सांगत होती का?प्रचंड नकारात्मकता घेऊन मी या जंगलात प्रवेश केला होता. आता नुसती काय झाडी बघायची, उन्हाळ्यात काय बघायला मिळणार आहे, ऊन्हाने त्वचा काळी पडेल, तहान लागेल, उन्हाचा त्रास होईल, अशी सततची किरकिर माझी चालू होती. पण आत आल्यानंतर जणू मी पूर्ण बदलले होते. या दोन्ही वाघिणींच्या त्या भेदक नजरांनी मला एक वेगळाच आत्मविश्वास दिला. कोणत्याही नव्या अनुभवाला अगदी थेट, डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने सामोरं जायचं, असंच तर त्या सांगत नसतील? कसली भीती वाटत असावी मला, नव्या अनुभवांची की ते घेण्यासाठी माझ्याकडे नसलेल्या आत्मविश्वासाची. जंगल सफारी म्हणजे काय हे कधी जाणूनही घेण्याचा प्रयत्न मी केला नव्हता. त्यामुळे मला वाटणारी भीती मी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत होते. पण नवे अनुभव आत्मविश्वासही देतात आणि अविस्मरणीय आठवणीही देतात, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. या दोन्ही वाघिणींनी मला ती जाणीव करून दिली. आज जवळपास सहा महिन्यांनी त्या नजरा मला अजूनही आठवतात आणि मला सांगतात की –

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.

1 comment on “नव्या अनुभवाची भीती आणि वाघिणींची शिकवण