नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी कक्षाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरूवारी रात्री १२ डिसेंबर रोजी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २५ ठिकाणी छापे टाकून १२ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसंच अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि बेकायदेशीर राहणाऱ्या १६ अफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि गुन्हे शाखा कक्षाकडील तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी १२ डिसेंबर रोजी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोंबिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण १५० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. त्यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये २५ ठिकाणी छापे टाकून कोकेन, एमडी पावडर, मिथीलीन, चरस, गांजा असे सुमारे ११ कोटी ८६ लाख रूपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १३ आफ्रिकन नागरिक व बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगणारे ३ अफ्रिकन नागरिक अशा एकूण १६ अफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. तसेच कारवा दरम्यान पासपोर्ट व व्हिसा संपलेल्या ७३ अफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत.