Lata Mangeshkar Birth Anniversary
  • September 28, 2025
  • Newsroomindia
  • 0

        लतादीदींची आज जयंती… अतिशय समृद्ध, अनेकांच्या आयुष्यात सुरांची सुंदर पखरण करणारं एकमेवाद्वितीय आयुष्य जगल्या त्या… गेली कित्येक दशकं कोटी कोटी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदी येत्या असंख्य पिढ्यांनाही वेड लावतात आणि लावत राहतील…

        माझी पिढी काही लता ऐकत वाढली नाही. तिच्या गाण्यांची वाट पाहणं, तिच्या गाण्यांसाठी चित्रपट पाहणं, तिच्या रेकॉर्ड्स,  कॅसेट्स आधाश्यासारख्या ऐकत राहणं हे आमच्या आईबाबांच्या पिढीने, त्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी केलं. त्यांचे सण, उत्सव ते त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या अंगाया ते त्यांची हळवी प्रेमगीतं, सगळीकडे लता होतीच. आम्ही तेवढे नशीबवान नाही. पण सुदैवाने माझ्या आजूबाजूच्या लताप्रेमींनी मला लता दिली. ऐकवली, दाखवली, शिकवली. तिच्या किती, किती गाण्यांनी काय, काय केलं हे शब्दांत मांडणं अशक्य आहे.

       

लताची असंख्य गाणी या लताप्रेमींच्या नादाने ऐकत राहिले मी… कधी ठरवून, कधी योगायोगाने तर कधी निव्वळ कुतूहल म्हणून. काही दिवसांपूर्वी वाचलेल्या एक लेखात १९५१ च्या ‘मालती माधव’ या चित्रपटातल्या “बाँध प्रीति फूल डोर” या गाण्याचा उल्लेख होता. मी ते ऐकलं नव्हतं, किमान ऐकल्याचं त्यावेळेस आठवेना. सहज युट्यूबवर मी ते ऐकलं आणि मी अक्षरशः वेडावून गेले. हलले… “दूर जाना ना…” या मोजून तीन शब्दांमध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीनं तिने जे काही ओतलंय… वाटलं, “अरे.. माझ्याच मनातलं गातीये ही…” आणि नंतरचे कित्येक दिवस माझ्यावर या गाण्याचं गारूड होतं… अजूनही आहे…

‘चाला वाही देस’ हा एक असाच हळवा कोपरा.. “माई म्हारो सुपणामा परनारे दीनानाथ…” काहीही अर्थ न कळताही मीरेची तडफड या गाण्यातून थेट मनाला भिडते ही किमया लताची… या अल्बमचं टायटल साँग… एकदा मी रात्री कुणालातरी सोडायला बाहेर गेले होते. परत येताना हे गाणं लावलं. दुसऱ्यांदा “चाला वाही देस” म्हणतानाचा तिच्या आवाजातला आक्रोश… थरकाप होता तो…

       गीतरामायणातलं “मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे”… प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटी त्या त्या शब्दाचा अर्थ मनाच्या गाभ्यापासून उमटून येतो लताच्या… “मज सांग…” म्हणताना अतर्क्य तारसप्तकात जात तिने मांडलेला आकांत… स्वतः सीतेने येऊनच लताच्या कानात आपली व्यथा मांडलेली असावी का? नाहीतर हे कुठून येतं तिच्या आवाजात?

लताची अशी कित्येको गाणी, कित्येको क्षणी तिच्या स्वर्गीय स्वरांनी माझ्या मनातल्या भावनांना, आकांतांना, आक्रोशांना करून दिलेली वाट… माझ्या भावनांना दिलेले सूर…

        आणि थेट दुसरं टोक.. मनात दाटलेलं सगळं मळभ क्षणार्धात दूर सारून आपल्या आवाजाने नकळत ताल धरायला लावणारीही लताच… अशी गाणी तर अगणित! भरगर्दीत रस्त्यावरून गाडी हाकतानाही, एखाद्या मैत्रिणीसारखी लता समेला येऊन भेटली, की “आ!” असं खास माझ्या श्रीधर दादाच्या स्टाइलमध्ये म्हणून हँडलवर हात मारायला लावणारी… “आहा रिमझिम के यह प्यारे प्यारे गीत लिए”, “सुनो सजना पपीहे ने”, “लौ लगाती, गीत गाती”, ‘अनुराधा’ची सगळी गाणी, खासकरून “साँवरे, साँवरे”… अशी असंख्य…

        लताचा फक्त आवाज दैवी नव्हता, ती संपूर्ण दैवी होती… ‘आनंदघन’ हे नाव तिने उगीच थोडंच निवडलं? “तू गुपित कुणाला सांगू नको आपुले”, “ऐरणीच्या देवा तुला”, “राजाच्या रंगम्हाली”, “माझ्या कपाळीचं कुकू”, “अखेरचा हा तुला दंडवत”… तिने संगीत दिलेली गाणीही अक्षरशः आनंदाची बरसात आणणारी… जी भावना त्यातून व्यक्त होत असेल, दुःख, विरह, आक्रोश, त्या त्या भावनेतला आनंद… अद्भुत होती ती… तिचं संगीत जितकं अथांग होतं, तितकंच अथांग तिच्या जाण्याने उमटलेलं दुःख होतं, हे आपल्या लक्षात असेलच…

 आनंद लता, दुःख लता, उत्साह लता, निराशा लता, प्रेम लता, विरह लता, प्रार्थना लता, अंगाई लता, नाती लता, एकटेपणा लता, सबकुछ लता… लता होती, आहे आणि राहणारच…

लेखिका – अंकिता आपटे

लेखिका पत्रकार असून सध्या मुंबई आकाशवाणी येथे कार्यरत आहेत.