७३ व्या वर्षी मालवली प्राणज्योत; हदयविकाराचा जाणवू लागला त्रास
उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या झाकीर हुसेन यांच्या निधनानं संगीत क्षेत्रासह, देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. ९ मार्च १९५२ मध्ये मुंबईत जन्मलेल्या उस्ताद जाकीर हुसेन यांनी तबला वादनातील उत्कृष्ट कौशल्यामुळे अल्पावधीतच मोठी झेप घेतली. त्यांचे हात तबल्यावर पडताच उमटणाऱ्या तालानं अनेक देश विदेशात अनेक चाहते त्यांनी निर्माण केले. सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत, झाकीर हुसेन यांना यावर्षी झालेल्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या तीन पुरस्कारांसह एकंदर ५ ग्रॅमी पुरस्कार मिळाले. उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या देशातल्या सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.