- October 3, 2025
- Newsroomindia
- 0
लेखक – भगवंत इंगळे
मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी ही त्यांची संपूर्ण जगाला असलेली ओळख. त्यांनी आपलं उभं आयुष्य जनसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेला अर्पण केलं. जनसेवा हीच ईश्वरसेवा हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून ते कार्य करत राहिले.
माणूस म्हणजे मूळ आहे. माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागणं म्हणजे ईश्वराजवळ जाणे, असंच त्यांनी मानलं. दलित, पददलित, पिचलेले, गांजलेले यांच्या उद्धारासाठी कार्य करणे हे त्यांचं उद्देश्य होतं. दलितांना ते हरिजन म्हणून संबोधत असत. हरिजन म्हणजे हरिचे, परमेश्वराचे लोक.
या देशातील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी मानवतेसाठी काम करण्याचा निर्धार केला. आणि त्यानुसार काम सुरू केलं. ते पेशाने वकील होते. मात्र गुजरातमधल्या सौराष्ट्रसारख्या प्रदेशात त्यांचा वकिली व्यवसाय चालत नव्हता. त्यांच्या एका वकील मित्राने त्यांना दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा सल्ला दिला. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, तिथे कृष्णवर्णीय कामगारांचे, मजुरांचे शोषण होत आहे. ते पाहून गांधीजींनी त्यांच्यासाठी काम करण्याचं ठरवलं. त्यादरम्यान भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती. ब्रिटीश सरकार भारतीयांचा छळ करत होतं. दक्षिण आफ्रिकेतही हीच अवस्था होती. तेथील भारतीयांना जाच केला जात होता. हे सर्व कामगार दूरवर कुठेतरी माळरानावर गुलामांच्या वस्तीत राहत होते.
ब्रिटीश भारतातील लोकांना कामगार म्हणून येथे घेऊन येत असत. मग हे लोक पिढ्यान् पिढ्या गुलाम म्हणून तेथेच राहत असत. गांधीजी तिकडे गेले असता, त्यांनी ती सर्व परिस्थिती पाहिली, काही बरे वाईट अनुभव घेतले. त्यानंतर त्यांना या लोकांसाठी काहीतरी ठोस काम करण्याची गरज वाटू लागली. पैसे नंतरही कमावता येतील, पण आधी या लोकांसाठी काम करायला हवं, या जाणिवेने गांधीजींनी काम सुरू केलं. या कामगारांकडून अगदी जगण्यापुरता मोबदला घेऊन गांधीजी आपल्या कायदेशीर ज्ञानाचा वापर करून त्यांना मदत करत असत.
येथे कमावलेला पैसा केवळ उदरनिर्वाहापुरताच असेल आणि पैशाचा संचय करायचा नाही, असा निश्चय गांधीजींनी यावेळी केला. त्यामुळे आपली संपत्ती ही लोकांची, समाजाचीही संपत्ती आहे. त्यावर लोकांचाही अधिकार आहे. आपण केवळ या संपत्तीचे ट्रस्टी आहोत, असं त्यांनी ठरवलं. याचदरम्यान, जॉन रस्किन या लेखकाचे ‘अनटू द लास्ट’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्या पुस्तकाचा गांधीजींवर एवढा परिणाम झाला की त्यांनी धनसंचय कधीही केला नाही. आपल्याकडची संपत्ती कायम गरजूंमध्ये, समाजामध्ये कशी वाटता येईल, याचाच विचार केला.
दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी भारतीय समुदायासाठी जे काम केलं, त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. फक्त सामान्य जनताच नाही, तर कामगार नेते, तसंच इतर नेतेमंडळींच्या मनातही त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. त्यांच्या या दक्षिण आफ्रिकेतील कार्याचे पडसाद भारतातील जनतेवरही उमटले. तेथील कामगारांबद्दल गांधीजींनी केलेल्या कामाची भारतातल्या ब्रिटीश सत्तेनेही दखल घेतली. अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांशी त्यांची मैत्री झाली. गांधीजींचा त्याग, समर्पणाचा ठसा भारतीयांच्याही मनावर उमटला. त्यामुळेच रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. आणि अशा रितीने मोहनदास करमचंद गांधी ‘महात्मा’ झाले.
लेखक – भगवंत इंगळे
लेखक मुंबई दूरदर्शन येथे चित्रपट विभागात उपकेंद्रनिदेशक म्हणून कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले आहेत.











