History of Fabric
  • September 20, 2025
  • Newsroomindia
  • 0

वैष्णवी संयोग

माणसाची उत्क्रांती कशी झाली? आपल्या सर्वांनाच माहित आहे की माणूस पूर्वी माकड होता. मग जर तो आधी माकड होता, तर तेव्हा तो कपडे नक्कीच वापरत नसणार. मग कपड्यांची गरज माणसाला कधी भासू लागली? त्याने कपड्यांची निर्मिती कशी केली?

आज आपण अगदी १०० रुपयांपासून लाखो रुपये किमतीचे कपडे पाहतो, वापरतो. पण हे कपडे बनले कसे?

अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनासाठीच्या तीन मुलभूत गरजा आहेत. पण या तीन गरजांपैकी वस्त्र ही गरज फक्त मानवालाच आहे. ज्यावेळी मानवी जीवनामध्ये कोणतीही संस्कृती अस्तित्वात नव्हती, मानवाचा विकास झालेला नव्हता, तोवर माणूस कपडे वापरत नव्हता. म्हणजे थोडक्यात काय तर कपडे घालणे हे सुसंस्कृतपणाचं, विकासाचं प्रतिक मानलं जातं. १८ व्या शतकापर्यंत भारत हा कापड उद्योगामध्ये आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होता. त्यावेळी कापड हे हातमागावर बनवलं जायचं. हे बनवण्यासाठी अगदी बेसिक गोष्टी, टूल्स उपलब्ध होते. मात्र भारतातलं कापड ते बनवण्यासाठीचं कौशल्य आणि त्याच्यावरची कलाकुसर यासाठी प्रसिद्ध होतं. सिंधू संस्कृतीमध्ये इसवीसन पूर्व ३००० च्या आसपास मोहेनजोदाडोमध्येही कॉटनच्या कापडाचे अवशेष, ते तयार करण्यासाठीही काही यंत्रं संशोधकांना सापडली. या पुराव्यांच्या आधारे कापडाचा शोध कधी आणि कसा लागला असावा, याचा अंदाज बांधण्यात येतो. त्यानुसार, लिनन, लोकर, रेशीम आणि कॉटनचं कापड अगदी प्राचीन काळापासून वापरात असल्याचं आढळून येतं. याशिवाय, वेद, रामायण, महाभारतासारखे हिंदू धर्मग्रंथ, बौद्ध आणि जैन धर्माच्या साहित्यामध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाचे उल्लेख आढळतात. यावरून भारताला कापडाची किती जुनी आणि मोठी परंपरा लाभली आहे, हे दिसून येतं.

इ. स. पू. ३२७ मध्ये अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली त्यावेळी इथलं सुंदर छपाई केलेल्या कापडाचं त्याला आकर्षण वाटलं आणि तेव्हापासून भूमध्य सामुद्रिक देशांमध्येसुद्धा भारतीय सुती कापडाला प्रसिद्धी मिळाली. इसवीसन पूर्व २००० वर्षांच्या काळात भारतीय कापड इजिप्त देशात `ममी’ तयार करताना वापरत असत, असा उल्लेखही इतिहासात सापडतो.

हे कापड कसं तयार होतं? प्राणी, वनस्पती, केमिकल्स आणि मिनरल्स यांच्यापासून आधी तंतू तयार केले जातात.  या तंतूंना विशिष्ट प्रकारे पिळा देऊन त्यांच्यापासून धागे तयार केले जातात. त्यानंतर विणकाम, सूतकताई अशा विविध प्रक्रिया करून एक कापड तयार केलं जातं. पुढे या कापडावर नक्षीकाम करणं, त्याला रंग देणं, त्याच्यावर प्रिटींग करणं अशा प्रक्रिया करून कापड तयार होतं आणि या कापडापासून आपण रोजच्या आयुष्यात वापरतो असे कपडे तयार होतात.

पूर्वी नैसर्गिक पद्धतीने कापूस पिंजून, रेशीम किड्यांपासून कापड तयार केलं जायचं. पण जसजशी लोकसंख्या वाढली, तसतसं नैसर्गिक स्त्रोतांपासून बनणारं कापड अपुरं पडू लागलं. मागणी वाढली त्यामुळे शास्त्रज्ञांनी मर्यादित प्रमाणात असलेल्या नैसर्गिक तंतूंना पर्याय शोधायला सुरुवात केली.

रेयॉनचं नाव तुम्ही ऐकलंच असेल…ऐकलं काय…तुमच्याकडे रेयॉनचे बरेचसे कपडेही असतील. या चमकदार कापडाच्या तंतूंचा शोध १८८४ साली काऊंट हिलरी डी चारडोनेट या शासस्त्रज्ञाने लावला. त्यानंतर या रेयॉनमध्येही बरेच प्रकार शोधले गेले. तर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर करून नायलॉन या कृत्रिम तंतूंचा शोध १९४० साली डब्ल्यू एच कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने आपल्या काही साथीदारांसोबत लावला. पुढे काही इंग्रज शास्त्रज्ञांनी वेगवेगळे केमिकल्स वापरून पॉलिस्टरचाही शोध लावला. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम तंतू उदयाला आले आणि त्यापासूनही कापड तयार होऊ लागलं.

पुढे औद्योगिक क्रांतीनंतर कापड निर्मितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. कापड निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे आमूलाग्र बदल झाला. त्यामुळे सुरुवातीला अगदी छोट्याश्या वाटणाऱ्या कापड निर्मिती क्षेत्राला एक अवाढव्य स्वरुप मिळालं.