गरोदर राहणं ही सर्वच महिलांसाठी आनंदाची गोष्ट असते. गरोदरपणाच्या (Pregnancy) या काळात मात्र स्वतःची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण आपल्या कोणत्याही कृतीचा पोटातल्या बाळावर लगेच परिणाम होत असतो. गरोदरपणात बऱ्याच जणांना पचनाच्या समस्या जाणवतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). बद्धकोष्ठता म्हणजे शौचास साफ न होणे किंवा शौचास होत असताना त्रास होणे. गरोदरपणात बद्धकोष्ठता झाल्यास कोणती काळजी घ्यावी, कोणते उपाय करावेत, याबद्दल या लेखातून माहिती देत आहोत.
आहार
गरोदरपणात झालेली बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी प्रभावी उपाय (Home Remedies for Constipation) म्हणजे आहारावर नियंत्रण. फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण आहारात वाढवणे आवश्यक आहे. आहारात डाळी, विविध प्रकारची फळे, धान्य, कडधान्ये, भाजीपाला यांचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सुका मेवा, दाण्याच्या भाज्या म्हणजे घेवडा, वाटाणा अशा भाज्यांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते. शिवाय दही, लिंबू अशा प्रोबायोटिक (Pro Biotics) पदार्थांचं सेवन करणंही पचनासाठी फायदेशीर ठरू शकतं.
द्रवपदार्थ
बद्धकोष्ठतेपासून सुटका करण्यासाठी आहारात पाण्याचे किंवा द्रव पदार्थांचे सेवन (Liquid Diet) करणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेने रोज ७ ते ८ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ताक, नारळपाणी विविध डाळींचे पाणी, कडधान्यांचे पाणी, फळांचा रस (Fruit Juice) यांचं सेवन अवश्य करावं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर पचनासाठी मदत होते. तसंच पाण्यामुळे चेहऱ्यावर तजेला येणं, फ्रेश वाटणं हेही फायदे आहेतच.
जेवणाचे भाग करावेत
एकाच वेळी जास्त प्रमाणात जेवण करू नये. यामुळे तुमचं पोट खूप भरतं आणि त्याच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळानंतर थोडं थोडं खात राहणं हा चांगला उपाय आहे. काही अंतराने खात राहिल्याने पोटही भरलेलं राहतं आणि शरीराला पचनासाठी पुरेसा वेळही मिळतो. तसंच एकाच वेळी भरपेट खाल्ल्याने होतो तसा त्रासही होत नाही.
व्यायाम
गरोदरपणातही व्यायाम (Exercise) अतिशय महत्त्वाचा आहे. चालणे हा एक चांगला व्यायाम होऊ शकतो. त्यामुळे अन्न पचनासही मदत होते आणि मोकळ्या हवेत फिरल्याने मनही प्रसन्न राहते. शिवाय योग्य मार्गदर्शनाखाली योगासने करणंही या अवस्थेत फायदेशीर ठरतं. नियमितपणे व्यायाम केल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास निश्चित मदत होते. तुम्ही जीमला जात असाल, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायामप्रकार करू शकता. (Exercises During Pregnancy)
लॅक्सेटिव्ह्ज
विविध प्रकारची लॅक्सेटिव्ह्ज (Laxatives During Pregnancy) तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. पण हा अगदी शेवटचा उपाय असेल. वरील सर्व उपाय करूनही जर तुम्हाला आराम वाटत नसेल, तर हा उपाय करता येऊ शकतो. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि शौचाला होत असताना त्रास होत नाही.
महत्त्वाचा इशारा – गरोदरपणामध्ये कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय करणे धोकादायक ठरू शकते.