Book Review Mafia queens of Mumbai

वैष्णवी संयोग

“पुरुषापेक्षा स्त्री अधिक धोकादायक असते”, रुडियार्ड किपलिंग यांच्या जवळपास शतकभरापूर्वीच्या जुन्या कवितेतील ही एक ओळ. मुंबईच्या इतिहासातील काळ्या कालखंडाच्या एका महत्त्वाच्या भागाचं वर्णन करणारी ठरते. साधारण ७० ते ८० च्या दशकात मात्र या अंडरवर्ल्डने मुंबईसह संपूर्ण देश आणि जगालाही हादरवून सोडलं होतं. याच अंडरवर्ल्डच्या राण्यांची कहाणी सांगणारं हे पुस्तक म्हणजे – माफिया क्वीन्स ऑफ मुंबई.

कामानिमित्त काही काळ अगदी कोअर मुंबईत – परळ भागात मी काही काळ राहत होते. लालबाग, हिंदमाता, दादर, भायखळा हे भागही जवळपासच होते. त्या मुंबईच्या रस्त्यांवरून फिरताना जुन्या चाळींचे, मिल्सचे अवशेष दिसायचे. जुनी घरं, इमारती, रस्ते, दवाखाने पाहताना मुंबई मला खुणावू लागली आणि त्यामुळेच मुंबईविषयी अधिकाधिक जाणून घेण्याच्या कुतुहलापोटीच ही अंडरवर्ल्डची दुनिया माझ्यासमोर उलगडली. खरंतर हे जग माझ्या जन्माच्या आधीच मोडकळीस आलं होतं. दाऊद फरार होऊनही तोवर बराच काळ लोटला होता. पण तरीही या जुन्या कालखंडाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती.

हे पुस्तक हातात आलं आणि केवळ माहितीच नव्हे तर पत्रकारितेच्या क्षेत्रात आणखी खोलात जाऊन काम करण्याची प्रेरणाही मिळाली. पत्रकार हुसेन झैदी यांनी अंडरवर्ल्डविषयी सखोल अभ्यास केला आहे. या विषयावरची त्यांची इतरही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. डोंगरी ते दुबई, भायखळा ते बँकॉक ही पुस्तकेही मी वाचलेली आहेत. ज्या रंजक पद्धतीने त्यांनी अंडरवर्ल्डमधल्या घटना आपल्यासमोर मांडल्या आहेत, त्या वाचून अक्षरशः सर्व चित्र समोर उभे राहते. माफिया क्वीन्स ऑफ मुंबई हे पुस्तकही तसं चित्र आपल्यासमोर उभं करते. जेनाबाई दारुवाली, गंगूबाई काठियावाडी, सपना, ज्योती आदिरलिंगम अशा लेडी डॉन तर आपल्या पतीला साथ देण्यासाठी, पत्नीधर्म निभावण्यासाठी या अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सुजाता निकाळजे, आशा गवळी, नीता नाईक यांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. अंडरवर्ल्डच्या भाई दादांच्या खांद्याला खांदा लावून, तर कधी पडद्यामागून सूत्रं हलवणाऱ्या या पाताळयंत्री स्त्रियांच्या या कहाण्या म्हणजे त्यांच्या आयुष्याचं, त्यांच्यामुळे मुंबईसह देशभरात झालेल्या परिणामांचं वास्तववादी चित्रण आहे. या स्त्रियांना माफिया क्वीन्स का म्हटलं आहे, हे पुस्तक वाचूनच कळेल.

सखोल संशोधन, या लेडी डॉन्सचं तसंच अंडरवर्ल्डमधील अनेक लोकांच्या थेट मुलाखती घेऊन त्याद्वारे माहिती घेऊन हे पुस्तक समोर आणलं आहे. या पुस्तकाची भाषा अगदी चित्रमय आहे. हे पुस्तक आपल्याला नकळत भूतकाळात घेऊन जातं आणि तेवढ्यात नकळत भूतकाळातून वर्तमानकाळात आणून सोडतं. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे या राण्यांच्या कहाण्या पुस्तकात मांडल्या आहेत. त्यामुळे वाचकांना अगदी एखादा चित्रपट पाहिल्याप्रमाणे अनुभव मिळतो.

सुंदर, नाजूक, रेखीव, दयावंत, कोमल अशी विशेषणं शक्यतो स्त्रियांसाठी वापरली जातात. मात्र हे पुस्तक वाचल्यावर काही स्त्रियांना निडर, बेदरकार, क्रूर, निर्दयी ही विशेषणंही वापरली जाऊ शकतात, हे लक्षात येतं. या स्त्रिया ठरवून या काळ्या जगात आल्या नाहीत. परिस्थितीने त्यांना हे जग स्विकारण्यावाचून काही पर्यायच ठेवला नाही. काही जणी पोट भरण्यासाठी यात आल्या, काही जणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी इकडे वळल्या तर काही जणी गरिबीला कंटाळून या क्षेत्रात आल्या. पण त्यांनी समाजाच्या ठरवून दिलेल्या सीमा, मर्यादा मात्र मोडून काढल्या.

या पुस्तकासाठी लेखकाने या स्त्रियांचे नातेवाईक, पोलीस, पत्रकार यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले अहवाल, पोलिसांच्या नोंदी, न्यायालयीन कागदपत्रं यांचा संदर्भही घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाची विश्वासार्हता अधिकच वाढते. गुन्हेगार स्त्रियांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिकतेला समजून घेण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केला असून त्यांचं उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं लेखक वारंवार आपल्या लिखाणातून स्पष्ट करतो.