- September 23, 2025
- Vaishnavi
- 0
- वैष्णवी संयोग
घरोघरी उजळे दीप,
देवीचे गाई स्तवन रूप.
धैर्य, ज्ञान, समृद्धी दान,
नवरात्री देई जीवनाला मान
कशी वाटली ही कविता? ही कविता माझी नाही, तर ही कविता चॅट जीपीटीची आहे. नवरात्रीसंदर्भात एक कविता करून दे अशी एका वाक्यात केलेली मागणी आणि लगेच चार कडव्यांची कविता समोर आली. कृत्रिम बुद्धिमत्तेने घडवलेली ही केवढी मोठी क्रांती आहे. अगदी लेखासाठी मुद्दे देण्यापासून ते संपूर्ण लेख लिहून देण्यापर्यंत सगळीच्या सगळी कामे आर्टिफिशल इंटेलिजन्स करू शकतं. पत्रकारितेचं क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेलं नाही. बातमी लिहिणे, त्यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, त्या माहितीचं इन्फोग्राफिक किंवा गोष्टीत रुपांतर करणे सगळं काही या आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे आज शक्य आहे. अर्थात ही तांत्रिक प्रगती आपल्या उपयोगाची आणि फायद्याची आहेच. पण यामुळे पत्रकारितेतल्या एका मोठ्या मूल्याला धोका निर्माण होत आहे. ते मूल्य म्हणजे विश्वासार्हता.
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या या जगात पत्रकारितेतली विश्वासार्हता कशी टिकवता येईल?
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने एखादी बातमी अधिक प्रभावीपणे लिहिणे, त्या विषयासंदर्भातली माहिती गोळा करणे, डेटावर आधारित असलेल्या बातम्यांचं लेखन या गोष्टी करता येणं शक्य आहे. यामुळे बातम्या किंवा लेख वेगाने, मोठ्या प्रमाणावर तयार होतील. बऱ्यापैकी वेळही वाचतो. पण यामध्ये चुकीची माहिती दिली जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने मिळालेल्या माहितीचा स्रोत कोणता, ती माहिती चूक की बरोबर याची खातरजमा कोण आणि कशी करणार ? वाक्यांमध्ये, वाक्यरचनेमध्ये येणारा तोच तोच पणा, मर्यादित शब्दसंपदेचा वापर ही आव्हाने देखील आहेतच. शिवाय आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापरामुळे अनेक नैतिक प्रश्नही निर्माण होतात. म्हणजे एखादा लेख जर एआय वापरून लिहिला असेल तर लेखक म्हणून आपण एआयचा उल्लेख करणार का? जर तो नाही केला, तर ती वाचकांची फसवणूक नव्हे का? समजा एआयच्या मदतीने लिहिलेल्या बातमीमध्ये किंवा लेखामध्ये एखादी तथ्यात्मक चूक झाली तर त्याची जबाबदारी कोणाची – एआयची की संपादकांची?
शिवाय एआयचा वापर करून बनावट बातम्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या, माहिती लेख यांचं प्रमाणही वाढत आहे. यामुळे पत्रकारितेच्या प्रमुख मूल्यांपैकी पारदर्शकता, सत्यासत्यता, विश्वासार्हता ही मूल्ये धोक्यात आहेत. या नैतिक आव्हानांचा सामना आपण कसा करणार?
एआय सध्या मानवी लेखनशैलीची केवळ नक्कल करू शकते. पण मानवी निर्णयक्षमता आणि संवेदनशीलता एआयच्या क्षमतेत नाही. त्यामुळेच पत्रकारितेसारख्या संवेदनशील क्षेत्रात एआयचा वापर करताना अधिक काळजी आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे.
मात्र एआय पत्रकारांसाठी एक चांगला साहाय्यक म्हणून निश्चितच काम करू शकते. पूर्वनियोजित मजकूर, लेख, माहिती यांच्यासाठी एआय उत्तमरित्या काम करू शकेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार राजीव मुळ्ये यांनी व्यक्त केलं आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटाचे विश्लेषण करून मानवी बुद्धिमत्तेला किंवा क्षमतेला शक्य नसणारे पॅटर्न शोधण्यासाठी एआयची मदत घेता येऊ शकते. याशिवाय आकडेवारी असलेली बातमी असल्यास त्याची इन्फोग्राफिक स्वरुपातली मांडणी एआयच्या माध्यमातून करता येईल. यामुळे बातमी अधिक प्रभावी होईल. त्याचबरोबर विविध भाषांमधल्या मजकूराचं एआयच्या मदतीने भाषांतर करून तो वाचकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
एआयच्या वापरासाठी काही निकष माध्यमसंस्थांनी ठरवून घ्यायला हवेत.
- एआयच्या वापरासाठी माध्यमसंस्थांनी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे ठरवून घ्यावीत. अचूकता, निष्पक्षता यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेऊन एआयचा वापर करावा.
- एआय साधनांच्या योग्य वापराचं पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात यावं. त्याचप्रमाणे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रमात या एआय टूल्सच्या जबाबदारीने वापर करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात यावे.
- वाचकांना एआय जनरेटेड कन्टेटविषयी स्पष्टपणे माहिती देण्यात यावी.
पत्रकारितेची मूल्ये ही अजूनही मानवाची संवेदनशीलता, विवेकबुद्धी यांच्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे ती जपणे, तो मानवी धागा तुटू न देणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. एआयची मदत घेऊन या मूल्यांची जपणूक करायला हवी. पत्रकारितेचं भविष्य हे फक्त तंत्रज्ञानावर नाही तर आपण त्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करतो यावर अवलंबून आहे.


