दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं केली. विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. १० जानेवारीला अधिसूचना जारी होईल, १७ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १८ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २० जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीत एक कोटी ५५ लाख २४ हजारपेक्षा अधिक मतदार आहेत. १३ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यानंतर मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगावर झालेल्या सर्व आरोपांचं राजीव कुमार यांनी यावेळी खंडन केलं. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असते, असं राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं.