
केंद्रीय किटकजन्य रोग नियंत्रण पथकाकडून उपाययोजनांची पाहणी नवी मुंबई मुंबई केंद्र राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, दिल्ली यांच्या संचालक डॉ. तनु जैन यांनी आज नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हिवताप व डेंग्यू नियंत्रणाबाबत उपाययोजनांची पाहणी केली. त्यांच्यासोबत त्यांचे पथक आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा, पुणे सहसंचालक डॉ. बबीता कमलापूकर, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर तसंच सहाय्यक संचालक, कोकण भवन डॉ. बाळासाहेब सोनावणे उपस्थित होते. केंद्रीय पथकाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरानगर इथल्या जनजागृती शिबिराला भेट दिली. शिबिरामध्ये घरातल्या आणि घराभोवतालील डासोत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिकं पाहिली. देशातील इतर राज्यातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन व्हावे या उद्देशाने त्याचे पूर्ण चित्रीकरण केलं आहे. हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचं आयोजन केलं जातं. या शिबिरांचं वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून जनजागृती केली जाते. आज 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी जाहीर शिबीरं घेण्यात आली. त्यामध्ये 9 हजार 983 नागरिकांनी भेट दिली असून, 1040 रक्तनमुने घेण्यात आले.