भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर, बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातून सुमारे ३७७ टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास काल सुरुवात झाली. हा विषारी कचरा १२ सीलबंद कंटेनर ट्रकमधून भोपाळपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे.
प्रारंभी, पिथमपूरमधील कचरा विल्हेवाट संयंत्रामध्ये काही कचरा जाळला जाईल आणि काही हानिकारक घटक शिल्लक आहेत की नाही हे शोधण्यासाठी त्याची राख तपासली जाईल. संयंत्रामधून निघणारा धूर विशेष चार थरांच्या गाळण्यामधून जाईल जेणेकरून आजूबाजूची हवा प्रदूषित होणार नाही.
2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड या कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली, त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्य समस्या झाल्या. जगातील सर्वात वाईट औद्योगिक आपत्तींपैकी ही एक घटना मानली जाते.