महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडायला, तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडचा अतिरिक्त निधीची गुंतवणूक प्राधिकृत करालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा, तसंच सर्व समाज विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
‘ई ऑफिस’च्या धर्तीवर ‘ई-कॅबिनेट’चं सूतोवाच या बैठकीत करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून हाताळला जावा, यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईल, ही त्यामागची भावना असल्याचं सांगण्यात आलं.
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल या बैठकीत शोकप्रस्ताव मांडून, मंत्रिमंडळानं त्यांना आजदरांजली वाहिली. डॉ. मनमोहन सिंग यांचं कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना मंत्रिमंडळानं व्यक्त केली.