राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत  गुरूवारी (दि. २) महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी बोलताना केले. गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, मागील काही वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. यामध्ये महिलांची वाढती संख्या ही उल्लेखनीय बाब आहे. महाराष्ट्र पोलीस हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या अद्वितीय समर्पण, शौर्य आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात. या जबरदस्त दलाने दहशतवादी हल्ले, संघटित गुन्हे, टोळी युद्धे आणि बॉम्बस्फोट अशा असंख्य आव्हानांना सामोरे जात त्यांचा यशस्वी सामना केला असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. 

मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी गोळ्या झेललेल्या तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. अशा शौर्यांच्या माध्यमातून भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. एक गुन्हेगार पुढे टोळीचे रूप धारण करू शकतो, त्यामुळे अनधिकृत शस्त्रे, अमली पदार्थ यांना पायबंद घालून महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारी नष्ट करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली. भयमुक्त वातावरण ठेवून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.   

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथक, मुंबई पोलीस सशस्त्र दल पथक, मुंबई पोलीस महिला पथक, ठाणे शहर- लोहमार्ग पोलीस पथक, मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक तसेच निशान टोळी सहभागी झाले होते. यावेळी विशेष संचलन आणि हर्ष परेड सादर करण्यात आली. तसेच पाईप बँड आणि सायलेंट आर्म ड्रिल ची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  यावेळी महासंचालकांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *