सीबीआय म्हणजेच, केंद्रीय अन्वेषण विभागाने विकसित केलेल्या, भारतपोल पोर्टलचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत शुभारंभ करण्यात आला. हे पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाच्या बाबतीत युगप्रवर्तक ठरेल, असा विश्वास शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या पोर्टलमुळे इंटरपोलसोबत अधिक समन्वय प्रस्थापित होणार असून, आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या पोर्टलची मोठी मदत होणार आहे, असं ते म्हणाले.

       विशेष म्हणजे प्रत्येक भारतीय तपास संस्था आणि राज्यांची पोलीस दलं या पोर्टलच्या माध्यमातून इंटरपोलशी सहज संपर्क साधू शकतील. तसंच रेड कॉर्नर नोटीस बजावलेले गुन्हेगार आणि इतर गुन्ह्यासंदर्भात, त्वरित अचूक माहिती यामुळे मिळणार आहे. यामुळे परदेशी फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी मोठी मदत होणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्ह्यांच्या तपासाला देखील गती येणार आहे, असं शाह म्हणाले.

     यामुळे भारताला सुरक्षा आव्हानांवर मात करण्यासाठी बळकटी मिळेल, असं ते म्हणाले.

    रेड कॉर्नर नोटीसह कलर कोडेड इंटरपोल नोटीसांसह  इंटरपोलद्वारे आंतरराष्ट्रीय साहाय्यासाठीच्या सर्व विनंतीच्या प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी या भारतपोल पोर्टलचा वापर केला जाणार आहे.

     इंटरपोलचं  वेगवान सहाय्य मिळण्याच्या दृष्टीनं कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना वास्तविक वेळेतील माहितीची देवाणघेवाण  उपलब्ध होण्याचीही सुविधा या पोर्टलमुळे उपलब्ध होणार आहे.

 सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, संघटीत गुन्हे, अंमली आणि मानवी पदार्थांच्या तस्करीचे गुन्हे  यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वेगवान तपास करण्याच्या दृष्टीनं हे भारतपोल पोर्टल फायदेशीर ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी सुलभ आणि जलद सुविधा उपलब्ध होण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना हे पोर्टल अधिक बळकट करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *