देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी (ता. २६ डिसेंबर) रात्री नवी दिल्लीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंह यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. आज नवी दिल्लीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. सिंग यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून चांगली नव्हती, काल घरी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे काल रात्री ८ च्या सुमाराला त्यांना  गंभीर अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असताना रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंह यांनी भारतात आर्थिक सुधारणांचा पाया  रचला.  १९९१ ला तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी जागातिकीकरण आणि उदारीकरणाचा आणि खासगीकरणाचा निर्णय घेतला. आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली.

 २००४  ते २०१४ या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय आजही प्रासंगिक आहेत . बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणलेली रोजगार हमी योजना ,प्रत्येक भारतीयांची ओळख असलेलं आधार कार्ड , भारत – अमेरिका अणु  करार , शिक्षणाचा अधिकार ,अन्नसुरक्षा  कायदा  हे निर्णय त्यांच्या पंतप्रधान काळात घेतले गेले.

  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर , प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ते भारताचे पंतप्रधान हा  डॉ. मनमोहन  सिंह यांचा  प्रवास थक्क करणारा आहे. विद्वान ,  मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं . ते ३३ वर्ष खासदार राहिले .जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर  सलग दहा वर्ष  देशाच्या पंतप्रधानपदी असलेले डॉ. मनमोहन सिंह  पहिलेच पंतप्रधान होते . १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

    २६  सप्टेंबर १९३२ ला  अखंड भारतातील   पंजाब प्रांतात  जन्मलेल्या  डॉ. मनमोहन सिंह यांनी १९८२ ते  १९८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर,  १९८५ ते  १९८७ या काळात  भारताच्या  योजना आयोगाचे उपाध्यक्ष, १९९० ते १९९१ पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार अशी महत्वाचाही पदं भूषवली . आंतराष्ट्रीय नाणेनिधी ,आणि आशियायी विकास बँकेतही त्यांनी मोलाचं योगदान दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *